कुठल्याशा चित्रपटातला तो प्रसंग एका श्रीमंत घरच्या दिवाणखान्यातील कोप-यात जुन्या काळचा तो
ग्रोमोफोन फिरत्या रेकॉर्डवर स्वर आठवत असतो. ' जब दिल ही टुट गया, हम जी के क्या करेंगे '
स्मृतीत गेलेला तो सहेगल ऐकत हा कलाकारही काही काळ स्मरणरंजनात बुडालेला ! हळूहळू त्या रेकॉर्डची
गती कमी होत जाते आणि मग त्या स्वरांबरोबरच तो काळही पुन्हा स्मृतीत हरवतो काळाच्या ओघात हरवलेले
हे स्वर आणि या स्वरांना बांधून ठेवणा-या त्या रेकॉर्डस जतन करण्याचे अफलातुन काम सोलापूरच्या श्रीराम पुजारी
संगीत संग्रहालयाने केले आहे.
सोलापूरच्या सांस्कृतिक जीवनात हिराचंद नेमचंद वाचनालयाचे स्थान बरेच मोठे आहे. या संस्थेच्या वतीनेच
१९८० मध्ये संगीत विभागही सुरु करण्यात आला. संगीतविषयक कार्यक्रम, चर्चा, व्याख्याने, ग्रंथालय आदी
उपक्रमांतून हा विभाग कार्यरत झाला या अंतर्गतच. संस्थेकडे जुन्या ध्वनिमुद्रिका व तबकडयांचा संग्रहही होऊ लागला.
या सा-या संग्रहातूनच संगीत संग्रहालयाची कल्पना पुढे आली आणि १९ मार्च २००६ रोजी त्याला मूर्त रुप देण्यात आले.
संगीतप्रेमी श्रीराम पुजारी यांच्या नावे सुरु झालेल्या या संग्रहालयाचे उदघाटन ज्येष्ठ गायक पंडित प्रभुदेव सरदार यांच्या हस्ते झाले.
संगीत संग्रहालयात प्रत्यक्ष पोहचल्यावर या दुनियेतच गढून गेलेले एक संगीत अभ्यासक मोहन सोहनी स्वागत
करत पुढे आले आणि या आगळ्यावेगळ्या संग्रहावर आमची मैफल रंगू लागली.
' इथे या रेकॉर्डस् , कॅसेटस् , आणि हल्लीच्या सीडीतून हरवलेल्या सुरांचे जतन करतो ' त्यांच्या या पहिल्या
वाक्यातून या संग्रहालयाची ओळख आणि दिशा सापडली. एकूणच इथे पाहण्यापेक्षा ऐकण्याचा भाग मोठा होता.
खरे तर हे संग्रहालय म्हणजे वाचनालय आणि सोलापूरच्या सोसायटी ऑफ रेकॉर्ड कलेक्टर्स यांची संयुक्त निमिर्ती.
शंभर रेकॉर्ड्स , ग्रंथालय आणि काही दुर्मिळ वस्तू या शिदोरीवर यांनी संगीताची ही आगळी मैफल सुरु केली.
अगदी सुरुवातीला पुजारी कुटुंबीय, पं. जसराज , कलेक्टर्स सोसायटीचे सोवनी, जयंत राळेरासकर यांनी आपल्याकडील दुर्मिळ
खजाना इथे रिता केला. लाकांनाही आवाहन करण्यात आले आणि पहता पहाता या मैफिलाला आकार येऊ लागला.
शास्त्रीय गायंकापासून ते चित्रपट गायकांपर्यंत अनेक हरवलेल्या मेळा इथे जमू लागला. अवघ्या तीन वर्षात ही पुंजी दोन हजार रेकॉर्डस्,
दोनशे कॅसेटस् आणि तब्बल दीड हजार तासांचे सीडीवरचे रेकॉर्डिंग एवढी झाली.
गोहरजान नावाची जुन्या काळतील गायिका ,तिची १९०८ मध्ये निघालेली एक रेकॉर्ड हा इथला सर्वात जुना सूर !
ज्या काळी महिलांसाठी घराबाहेर पडणेही मुश्कील होते, त्या काळी त्यांनी गायलेली ही गाणी. केसरबाई केरकर हेदेखील असेच एक नाव.
जयपूर घराण्याच्या या ज्येष्ठ गायिका. त्यांचा आवाज आकाशवाणीवरुनही कधी ऐकला नव्हता. अशा वेळी त्यांच्या दुर्मिळ रेकॉर्ड संस्थेने मिळवल्या
आणि एका हरवलेल्या आवाजाला संजीवनी दिली. मोगुबाई कुर्डीकर, हिराबाई बडोदेकर, प्रभा अत्रे, फैयाज खाँ, अब्दुल वहीद खाँ हे असेच एकेक
दिग्गज या उपक्रमानेच या मैफिलीला जोडले गेले.
कुमार गंधर्वांचे निर्गुणी पध्दतीचे भजन सुरु झाले आणि सा-या वातावरणालाच भारवलेपण आले. त्यांची नाट्यगीते, शात्र्यीय गीते,
संगीत मैफिली इथेच आहेत, पण ही निर्गुण भजने कुमार गंधर्वांची खासियत ! तीच ऐकायला मिळत होती. ती ऐकता ऐकता समोरच्या तबकडयाही गूढ बनल्या.
पं. भिमसेन जोशी. पं. जसराज पं. जितेंद्र आभिषेकी. पं. वसंतराव देशपांडे या दिग्गजांचा संगीतप्रवासही असाच उलगडू लागला. पं.रविशंकर,
बिस्मिल्लाखाँ, हरिप्रसाद चौरासिया, अल्लारखाँ, झाकीर हुसेन यांचे वादनही पुढे आले. रविशंकर यांचे बाबा अल्लाउद्दीन खाँ यांचे सरोद वादन आणि
सोलापूरचे सिद्राम जाधव यांचे संद्रीवादन या सा-यांत तेवढेच दुर्मिळ देत गेले. त्यातले अनेक आवाज, मैफिली पन्नास -साठ वर्षापूर्वीच्या ! कधी तो कलाकार
म्हणुन कधी ती मैफल म्हणून, तर कधी तो हरवलेला काळ म्हणून प्रत्येक गाण्यासाठी वेगळा कान पुढे करायचा !
चित्रपट गायनाचीही हीच त-हा ! गेल्या शतकभरातील ते वेगवेगळे आवाज एकाच वेळी एकाच ठिकाणी भेटतात. रतन मधली रुम झुम बरसे बादखाँ
गाणारी ती जोहराबाई, नाकातल्या विशिष्ट सुरांमध्ये कभी आर कभी पार, गाडीवाले गाडी धीरे हाक रे अशी हटके गाणी गाणारी शमशाद बेगम या गायिका
भुले बिसरे गीत घेऊन पुढे येतात. समोर रेकॉर्डस्, असतात, पण कुठेतरी रेडिओ ऐकल्याचा भास होतो. नुरजहाँ, गीता दत्त, के.एल सहगेल,
के.सी.डे, महमद रफी आणि लता मंगेशकर हे संगीतातील सप्तसूर तर या सा-या संग्रहालयावर अधिराज्य गाजवत असतात. नूरजहाँची भारतातील आणि
पाकिस्तानातीलही गाणी इथे आहेत. इक्बाल बानू आणि मुन्नी बेगम हे पाकिस्तानी कलाकारही इथे भेटतात. आगळ्या गळ्याच्या सहेगल तर काळाला थांबायला
लावतो. गीता दत्त, रफि तसेच ! लता मंगेशकरांची तर तब्बल दीड हजार गाणी इथे मैफिलीत आहेत. पण यातही कुणाच्या गावीही नसलेले त्यांचीच
बालकलाकाराची भूमिका असलेल्या माझं बाळ या १९४२ च्या चित्रपटातील हा रुसवा का लटका हास जरा हे अगदीच वेगळे गाणे ऐकल्याचा आनंद देते.
कधीकाळी तबकडयांच्या आधारे उमटलेले हे सूर या संस्थेने मोठ्या कष्टाने गोळा केले आहेत. या शोधकार्यातून सोलापूरच्या
मेहबूबजानसारख्या गायिका मिळाल्या. गदिमां च्या गीत रामायण ची जुनी रेकॉर्ड हाती लागली. रवींद्रनाथ टागोरांच्या ,
कवी यशवंतांच्या त्यांनीच गायलेल्या कवितांचा ऐवज हाती आला. महात्मा गांधी, पंडीत नेहरु,सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब
आंबेडकर आदी विभूतींची भाषणे सापडली. संगीताच्या भक्तीतून, कधी काळच्या तबकड्यांच्या संग्रहातुन हा सारा ठेवा जमा होत गेला.
संग्रहालयाने आता हा सारा ऐवज संगणकावर आणून तो जनतेला ऐकण्यासाठी खुला केला आहे. यातूनच कुणा कुमार गंधर्व,
वसंतराव देशपांडे यांच्या जुन्या मैफिलींची आठवण काढत, तर कुणी तो सहेगलचा बाबुल मोरा आणि लताचे बरसे अशा रचना विचारत
या संग्रहालयाची पायरी चढते. संस्थेतर्फे दर महिन्याकाठी संगीतविषयक दोन कार्यक्रम केले जातात.
संगीत संग्रहालय
- श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संगीत संग्रहालयाची सुरुवात दि. १९ मार्च २००६ रोजी पंडीत प्रभुदेव सरदार यांचे हस्ते झाली.
- संगीत संग्रहालयात दुर्मिळ ध्वनिमुद्रिका , संगणकीय ध्वनिमुद्रित सुस्थितीत उपलब्ध आहे. यामध्ये दोन ग्रामोफोन , हिंदी ,मराठी ( चित्रपट )
ध्वनिमुद्रिका २५०, शास्त्रीय गायन वादन ध्वनिमुद्रिका १५०, पं. प्रभुदेव सरदार यांच्या ७५ कॅसेट , सीडी ५० , ७८ RMP ध्वनिमुद्रिका १५० यांचा समावेश आहे.
तर संगणकीय ध्वनिमुद्रण १९० GB इतकं आहे.
- संगीत संग्रहालया मार्फत आज पर्यत ( सन २००८ ते सन २००९ ) एकून २० कार्यक्रम केले गेले आहेत.
- ‚ŸûÅú थिएटर मधील प्रोजेक्टर वर वैजयंती माला या अभिनेत्रीच्या नृत्य गीतांवर आधारीत कार्यक्रम केला.
- संगीत संग्रहालयातील सर्व कार्यक्रमांचे आयोजन श्री. मोहन सोहनी आणि श्री. जयंत राळेरासकर हे करत असतात.
- संगीत संग्रहालया मध्ये असणा-या ध्वनिमुद्रिकांचा तपशील " संगणकीय अनुक्रमणिकेत " आहे.
- संगीत संग्रहालयास रेकॉर्डस भेट देणारे देणगीदार पुढील प्रमाणे
१) श्री. पुजारी सर | ०८ जीबी |
२) श्री. प्रकाश साठे | ५४० एमबी |
३) श्री. सुनिल राजकेरकर ( मुंबई ) | १० जीबी |
४) श्री. दिलीप शेटे | ३८८ एमबी |
५) श्री. सुनिल देशपांडे | ४७० एमबी |
|